सध्या राज्यभरात वातावरणात अनेक बदल होताना पाहायला मिळत आहेत. मार्च ते एप्रिलमध्ये कडाक्याने उष्णतेचा मारा पाहायला मिळत आहे. मात्र मे महिन्यात ज्यावेळेस उन्हाळा पुर्णपणे सुरु होतो या महिन्यात पावसाचा आणि गारपिटीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली.
त्याचसोबत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून राज्यात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडतो आहे. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे राज्यात पिकांचे मोठे नुकसान होताना पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान जाण्याची शक्यता आहे.
तसेच भारतीय हवामान विभागाकडून 17 जिल्हांसाठी पुढील सहा दिवस अवकाळी पावसासह, विजा आणि गारपिटीचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसलेला असतानाच आता गारपिट आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.