भाजपने मुंबई जिंकल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईचा महापौर नेमका कोण होणार, यासाठी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात नगरविकास खाते महापौर पदासाठी सोडत काढणार आहे. महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी मुंबईचा महापौर निवडला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 89 आणि शिंदे सेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिकरित्या महापौर पदावर भाजपचा दावा आहे. मात्र, शिंदे सेनेच्या काही नेत्यांनीही मुंबईच्या महापौरपदावर दावा ठोकला आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज आहे. हा आकडा भाजपला एकट्याला गाठता येणार नाही. त्यामुळे त्यांना शिंदे गटाची मदत घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे शिंदे गट महापौरपदासाठी अडून बसणार का, हे बघावे लागेल.
मुंबईतील अमराठी मतदारांनी भाजपला एकगठ्ठा मतदान करुन त्यांच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे. मुंबईतील मराठीबहुल भागात ठाकरे बंधूंच्या जागा निवडून आल्या. मात्र, अमराठी लोकसंख्या असलेल्या भागांमधून भाजपला मोठे यश मिळाले होते. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे जगातील अन्य देशांप्रमाणे कॉस्मोपॉलिटीन मुंबईत अमराठी व्यक्ती महापौर झाल्यास गैर काय, असा युक्तिवाद काहीजणांकडून करण्यात आला होता. त्यामुळे भाजप खरोखरच मुंबईत अमराठी व्यक्तीला महापौरपदी बसवणार का? महापौरपदासाठी भाजपमधील अनेक नगरसेवक इच्छूक आहेत. यापैकी कोणाची महापौरपदी वर्णी लागणार, हे बघावे लागेल.