संजय देसाई, सांगली | कोरोना नियमांचे पालन करा असा धडा शिकवणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाने कोरोना नियम अक्षरशः पायदळी तुडवून धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.जिल्हा परिषद आयोजित स्पर्धांच्या निमित्ताने सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये झिंगाट गाण्यावर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी थिरकताना कोरोना व ओमायक्रॉनचा विसर पडल्याचे समोर आले. या संदर्भातला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता कारवाईची मागणी जोर धरतेय.
सांगली जिल्हा परिषदेच्या कर्मचारी पदाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या स्पर्धा यावेळी पार पडल्या.मात्र कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्रशासनाच्या कर्मचारी- अधिकाऱ्यांचा धिंगाणा समोर आला आहे. कोरोना नियमांचं पालन करण्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.नागरिकांना मास्क,सोशल डिस्टंसिंग अशा गोष्टींच्या बाबतीत रोजरास प्रबोधन आणि दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र याच जिल्हा प्रशासनाचा भाग असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनीच सर्व नियम धाब्यावर बसल्याचे पाहायला मिळाले.
स्पर्धांच्या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने शिवाजी स्टेडियम झिंगाट गाण्यावर कोणत्याही सोशल डिस्टंसिंगचा नियम न पाळता किंवा मास्कचा वापर न करता बेभान होऊन थिरकल्याचा प्रकार समोर आला आहे.सदरचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियम सर्वसामान्य मोडल्यास जनतेला एक न्याय आणि सरकारी बाबूंना एक न्याय हे चुकीचे आहे.यांच्यावर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून कारवाई होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.