महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरश: नाकीनऊ आणले आहेत. पुण्यातील दौंड आणि बारामती येथे पावसाचे रौद्र रूप बघायला मिळत आहे. अशातच नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावर तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे शिवशाही बसवर बस स्थानकाचा स्लॅब कोसळला आहे. या घटनेचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.
नेमकं काय घडलं ?
सिन्नर तालुक्यात तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब तिथे उभ्या असलेल्या शिवशाही बसवर कोसळल्याची माहिती मिळत आहे. तिथे एक खाजगी चारचाकी गाडी देखील उभी होती. त्यावरही हा स्लॅब कोसळला. यावेळी शिवशाही बसमधील प्रवाशांना आपातकालीन खिडकीतून बाहेर काढलं.