( Pune) मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे झालेल्या उड्डाणपूल दुर्घटनेनंतर आता पुणे जिल्ह्यातील सर्व उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एकूण 627 उड्डाणपूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे.
या अहवालानुसार 63 उड्डाणपूल अत्यंत धोकादायक स्थितीत आढळले असून हे सर्व पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड न करता हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
याशिवाय 80 पेक्षा अधिक उड्डाणपूलांमध्ये डागडूजी व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित विभागांना आवश्यक निधीची तरतूद, यंत्रणा आणि मनुष्यबळ याबाबत योग्य ती तयारी ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.या संपूर्ण प्रक्रियेमुळे पुणे जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार असून अशा दुर्घटनांना रोखण्याची दिशा निर्माण होईल अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.