(Pune ) संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात दाखल होणार आहे. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आरोग्य सुविधा, फिरती शौचालये, पिण्याचे पाणी, निवाऱ्याचे शेड आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या सर्व महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
संत तुकाराम महाराजांची पालखी जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिघी, विश्रांतवाडी, संगमवाडी मार्गे पुण्यात प्रवेश करेल. महापालिका आयुक्त नवल किशोर राम स्वतः पालख्यांचे दर्शन घेऊन स्वागत करणार आहेत. तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी राहणार आहे. रविवारी पहाटे दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतील.
महापालिकेने मंदिर परिसरात मंडप, आरोग्य केंद्र, शोध व मदत केंद्र, सीसीटीव्ही, अग्निशमन सेवा यांची प्रभावी रचना केली आहे. फिरते दवाखाने, डॉक्टर, नर्स, औषध पुरवठा, औषध फवारणी यांचीही संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेता, पाणी साचू नये म्हणून विशेष पथके तैनात आहेत.