थोडक्यात
पुण्यातील भिडे पूल आजपासून बंद
मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम पुन्हा होणार सुरू
10 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत काम चालणार
(Pune Bhide Bridge) पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील मध्यवर्ती भागाला जोडणारा भिडे पूल तब्बल दीड महिन्यासाठी बंद ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने वनाझ–रामवाडी मेट्रो मार्गावरील डेक्कन जिमखाना स्थानकाजवळ पादचारी पूल बांधकामाला गती दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना काही काळ गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे.
गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 26 ऑगस्ट रोजी भिडे पूल तात्पुरता खुला करण्यात आला होता. मात्र, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. यावेळी मात्र नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध राहणार असून, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले की, पुलावरील काम पूर्ण झाल्यानंतर डेक्कन परिसरातील हजारो पादचाऱ्यांना सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध होतील. शनिवारवाडा, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता, मंडई, लक्ष्मी रोड यांसारख्या वर्दळीच्या भागांना जोडणाऱ्या या ठिकाणी पादचारी पूल ही गरज बनली आहे. मेट्रो स्थानक सुरू झाल्यानंतर या भागातील प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
भिडे पूल बंद राहिल्याने अल्पकालीन गैरसोय होणार असली तरी दीर्घकालीन दृष्टीने हा प्रकल्प पुणेकरांच्या सोयीचा ठरणार आहे. वाहतूक विभागानेही नागरिकांना गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची विनंती केली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.