(Pune ) पुणे विमानतळावर 10.5 कोटींचा हायड्रोपोनिक वीडसह एकाला अटक करण्यात आली आहे. एअर पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला 10.5 कोटींचा 'हायड्रोपोनिक वीड'सह अटक करण्यात आली.
संशयास्पद हालचालींमुळे या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडून सुमारे 10.47 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. एअर पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनय अमरनाथ यादव असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव असून
तो इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E-1096 ने 24 जुलै 2025 रोजी बँकॉकहून पुण्यात दाखल झाला होता. तपासणीदरम्यान त्याच्याकडे आढळलेल्या हायड्रोपोनिक वीडची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 10.5 कोटी रुपये आहे.
या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कस्टम्स विभागाकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.