मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. “पुणे हे देवेंद्रजींचं एक बेबी आहे” असं मत त्यांनी व्यक्त करत, मुख्यमंत्र्यांच्या पुणेप्रेमावर शिक्कामोर्तब केलं. यासोबतच त्यांनी पुण्यातील समस्या, नागरी सुविधा आणि महिला अत्याचारांवरही सविस्तर भाष्य केलं.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून हजेरी लावलेल्या अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी देवेंद्रजींना पुण्यातील समस्या सांगत असते. माझी आजीही पुण्यात राहते. मी जेव्हा इथे येते तेव्हा मला वाटतं मी माहेरी आले आहे. इथल्या लोकांबद्दल मला खूप आपुलकी वाटते. मी जेव्हा इथे येते तेव्हा इथे काय कमी आहे, काय सुधारता येईल हे सांगत असते. देवेंद्र फडणवीसांना कळतंच, पण मीही सांगते. मला आनंद आहे की तेही पुण्याकडे तेवढंच लक्ष देतात.”
कार्यक्रमानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पुढे सांगितलं, “पुणे आपली सांस्कृतिक राजधानी आहे. पुणे हे देवेंद्र फडणवीसांचं एक बेबी आहे. मुंबई, पुणे, नागपूर ही आपलीच मुलं आहेत असं देवेंद्रजी मानतात. पुण्यातही खूप समस्या आहेत. इतकं वेगाने शहरीकरण झाल्यामुळे काही गोष्टींकडे अद्याप लक्ष गेलेलं नाही. मलाही अनेकदा लक्षात येतं की रस्ते अजून चांगले पाहिजेत, वाहतूक व्यवस्थित हवी. मेट्रोनंही खूप फरक पडला आहे. पण सामान्य माणूस जोपर्यंत सुखदायी आयुष्य जगत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही देवेंद्रजी पुण्यातल्या त्यांच्या फेऱ्या कमी करतील.”
या कार्यक्रमात महिलांच्या कर्तृत्वाचा गौरवही करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांबाबत विचारणा झाल्यानंतर अमृता फडणवीस म्हणाल्या, “अशा घटना वेदनादायी आहेत. एकीकडे आम्ही आधुनिक महिला म्हणून मोठ्या शहरांमध्ये पुढे येत आहोत. पण त्याच शहरांमध्ये किंवा छोट्या गावांमध्ये महिलांवर आजही अत्याचार होत आहेत. हुंडाबळी किंवा इतर कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आपले राज्यकर्ते, पोलीस, न्यायपालिका यांच्याकडून महत्त्वाची भूमिका निभावली जाणं गरजेचं आहे. ही भूमिका ते निभावतही आहेत. पण दुसरीकडे प्रत्येक व्यक्तीला आत्मपरीक्षण करावं लागणार आहे. आपण पीडित महिलांना मदत करतोय का? आपल्या घरी महिलांचा सन्मान करायला हवा हे मुलांना शिकवत आहोत का? अशा गोष्टींमुळेच खूप मोठा फरक पडणार आहे.”
अमृता फडणवीस यांच्या या थेट आणि स्पष्ट भूमिकेमुळे त्यांच्या वक्तव्यांची सध्या समाज माध्यमांवर मोठी चर्चा सुरू आहे. पुण्याच्या विकासासाठी त्यांच्या भूमिका कितपत प्रभावी ठरतात, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.