राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि सध्या विधान परिषदेचे आमदार असलेले तानाजी सावंत यांना शनिवारी सायंकाळी प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. चक्कर येणे, उलटी होणे आणि हृदयाची धडधड वाढल्याच्या तक्रारींनंतर ही वैद्यकीय मदत घेण्यात आली.
सावंत यांना सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने लगेचच रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात दाखल होताच तातडीच्या वैद्यकीय पथकाने त्यांची प्राथमिक तपासणी केली आणि नंतर उपचारासाठी भरती करण्यात आले. रुबी हॉल क्लिनिकमधील मुख्य हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रँट व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तज्ञ डॉक्टरांचे पथक सावंत यांच्यावर उपचार करत आहे. त्यांना नेमका त्रास कशामुळे झाला, हे समजण्यासाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत.
रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “तानाजी सावंत यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर सातत्यानं लक्ष ठेवून आहे.”
प्रसिद्ध राजकीय व्यक्तिमत्त्व आणि आरोग्य खात्याच्या माजी प्रमुख म्हणून तानाजी सावंत यांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीसंदर्भात अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहे.