( Pune Crime ) पुणे शहरातील उत्तमनगर परिसरात सिगारेट न दिल्याच्या कारणावरून तरुणांच्या टोळक्याने एका दुकानावर थेट हल्ला केला. कोयत्याचा वापर करत दुकानाचे मोठे नुकसान करण्यात आले असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भागात घडला. दुकान मालक आणि आरोपी यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. हे तरुण नियमितपणे त्या दुकानात येत असत. काल त्यांनी दुकानदाराकडे सिगारेटची मागणी केली, मात्र दुकानदाराने नकार दिल्यामुळे वाद वाढला.
सुरुवातीला रागावून निघून गेलेले हे तरुण काही वेळात पुन्हा कोयते घेऊन परत आले आणि त्यांनी दुकानदाराला दमदाटी करत दुकानात तोडफोड केली. या हल्ल्यामुळे दुकानाचे आर्थिक नुकसान झाले असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेनंतर पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरु आहे. पुन्हा एकदा कोयता गँगच्या वाढत्या कारवायांमुळे पुणेकरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.