(Pune Metro) पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर मिळून 490 फेऱ्या चालवल्या जातात. आता गर्दीच्या वेळेत दर 6 मिनिटांनी ट्रेन धावणार असून, यामुळे अतिरिक्त 64 फेऱ्यांची भर पडेल. त्यामुळे 15 ऑगस्टपासून एकूण फेऱ्यांची संख्या 554 वर पोहोचणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना गर्दीचा त्रास होणार नाही.
सध्या गर्दीच्या वेळेत म्हणजे सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 8 या कालावधीत दर 7 मिनिटांनी ट्रेन चालते. परंतु नव्या वेळापत्रकानुसार गर्दीच्या वेळी दर 6 मिनिटांनी, तर विना गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी ट्रेन सेवा उपलब्ध असेल.
दरम्यान, पुणे महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 312 किमी मेट्रो मार्ग, 80 किमी बीआरटीएस मार्ग, 46 किमी बस मार्ग, 12 टर्मिनलचा पुनर्विकास आणि 19 उड्डाण पूल उभारण्याचे मोठे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांची अंदाजित किंमत सुमारे ₹1,33,535 कोटी आहे. हा आराखडा ‘पीएमआरडीए’ने एल अँड टीच्या मदतीने तयार केला होता, ज्यात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने सुधारणा करून शिफारसी समाविष्ट केल्या आहेत. या सर्व उपक्रमांमुळे पुणे आणि परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होऊन प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.