(Pune ) पुणे शहरातील हरित पट्टा वाढवण्यासाठी आणि झाडांची योग्य देखभाल सुनिश्चित करण्यासाठी पुणे महानगरपालिका आज 5 जून रोजी, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 'ट्री ॲम्ब्युलन्स ' सेवा सुरू करणार आहे.
ही विशेष सेवा शहरातील कीटकग्रस्त झाडांवर उपचार करण्यासाठी सज्ज असून, झाडांची शस्त्रक्रिया, कीटक नियंत्रण, पुनर्रोपण आणि वृक्षारोपण यांसाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ कर्मचारी उपलब्ध असतील. ही ॲम्ब्युलन्स हायड्रॉलिक चेनसॉ, इलेक्ट्रिक चेनसॉ, स्प्रे मशीन, बॅटरी बार कटर, वेल्डिंग केबल, वुडकटिंग अॅप्रन यासारख्या उपकरणांनी सुसज्ज असेल.
महापालिकेच्या उद्यान विभागाच्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या या उपक्रमाचे उद्दिष्ट शहरातील झाडांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, झाडांवर लावण्यात येणाऱ्या बॅनर्स, पोस्टर्स आणि खिळ्यांमुळे झाडांना नुकसान होते. अशा झाडांची तपासणी करून त्यांना उपचार देणे आणि त्यांच्या आरोग्याची निगा राखणे हे या सेवेमागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
या उपक्रमाचे स्वागत पर्यावरणप्रेमी आणि झाडांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी केले असले तरी झाडांची बेसुमार तोड आणि झाडांचे अपूर्ण पुनर्रोपण यावरही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. काही नागरिकांनी प्रशासनाकडे झाडांची तोड करताना योग्य सर्वेक्षण करण्याची आणि न परवाना दिल्यास झाडांची तोड रोखण्याची मागणी केली आहे.