(Pune) देशभरात आज 7 जून रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. बकरी ईद निमित्त पुण्यातील गोळीबार मैदान परिसरातील ईदगाह मैदानावर आज सामूहिक नमाज पठण होणार आहे. मुस्लिम बांधवांसाठी हा एक महत्वाचा सण असल्याने त्यांच्या या कार्यक्रमात कोणत्या ही प्रकारे अडचण येऊ नये यासाठी पुण्यातील वाहतुकीच्या मार्गांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत .कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
भैरोबानाला ते गोळीबार मैदान हा रस्ता सकाळी 6 ते 11.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात स्वारगेटकडे जाणारी जड वाहने प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याने-लुल्लानगर चौकाकडे वळविली जाणार आहे. तसेच पुणे स्टेशनकडे वाहने एम्प्रेस गार्डन रस्त्याकडे वळवले जाणार आहे. मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान हा मार्गही सकाळी बंद राहणार आहे अशी माहिती वाहतूक पोलीसांनी दिली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी बिशप स्कूल मार्ग/कमांड हॉस्पिटल मार्ग ते नेपिअर रस्त्याने पुढे सीडीओ चौकातून जाण्याचा पर्याय आहे.
सीडीओ चौक ते गोळीबार चौक हा रस्ताही सकाळी 6 ते 11.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात लुल्लानगरकडून येणारी वाहने सीडीओ चौकातून डावीकडे वळवली जाणार आहेत, तर खटाव बंगला चौकाकडून येणारी वाहने उजवीकडे नेपिअर रस्त्याकडे वळविली जाणार आहे.
जुनी सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार चौक हा रस्ता शनिवारी सकाळी बंद राहणार आहे. या रस्त्याने प्रवास करणारे लोक खाणे मारुती चौक-पुलगेट डेपो-सोलापूर बाजार चौक-नेपिअर रस्ता-खटाव बंगला चौका मार्गे जाऊ शकतात. तसेच लुल्लानगर चौकातून गोळीबार चौकाकडे जाताना जड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. या बदलामुळे वाहतुक कोंडी होणार नाही याची पूर्ण दक्षता पुण्याचे वाहतुक पोलीस घेताना दिसत आहेत.