(School Bus Accident ) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आज सकाळी एक भीषण अपघात घडला आहे. चंदनापुरी घाटामध्ये विद्यार्थ्यांनी भरलेली शालेय बस पलटी झाली. या अपघातात बसमध्ये 35 हून अधिक विद्यार्थी होते. अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पठार भागातून शाळेत आणण्यासाठी दररोज तीन बस सोडल्या जातात. आज सकाळी नेहमीप्रमाणे एक बस विद्यार्थ्यांना घेऊन चंदनापुरी गावाच्या दिशेने निघाली असताना नाशिक-पुणे महामार्गावर चंदनापुरी घाटात ती पलटी झाली. महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि असुरक्षिततेची स्थिती निर्माण झाली आहे.
या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य राबवले आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.