थोडक्यात
कप सिरप ची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय विकणे पडलं महागात
अन्न आणि औषध प्रशासनाने 20 दुकानांना ठोकले टाळे
पुणे विभागात गुरुवारी अन्न आणि औषध प्रशासनाने केली मोठी कारवाई
(Cough Syrup) मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील बालकांचा मृत्यू तामिळनाडूत उत्पादन होणाऱ्या एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. तामिळनाडूतील एका कंपनीच्या खोकल्याच्या औषधाच्या नमुन्यांत भेसळ आढळून आली असून या औषधावर बंदी घालण्यात आली आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमध्ये भेसळीमुळे झालेल्या बालमृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने आता महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. बाल रुग्णांसाठी 'सिरप' प्रवर्गातील औषधे डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विक्री केल्यास कठोर कारवाईचा इशारा अन्न व औषध विभागाकडून देण्यात आला आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम 1945 अंतर्गत अनुसूची एच,अनुसूची एच-1 आणि अनुसूची एक्स या औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तरी सुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री कोणी करत असेल, तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
कारवाईचा इशारा देऊनसुद्धा डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय कप सिरपची विक्री करणे महागात पडल्याचे पाहायला मिळत आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने 20 दुकानांना टाळे ठोकले आहे. पुणे विभागात गुरुवारी अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली असून मध्य प्रदेशात कप सिरप या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने पुण्यात तपासणी मोहीम सुरू केली. पुणे विभागात पुणे, सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे जिल्हे येतात. त्यात पुण्यात सर्वाधिक 17 दुकानावर तर सांगलीमध्ये 2 तर सोलापूरमधील एका औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.