थोडक्यात
वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा...
मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक
देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी नियोजित ब्लॉक जाहीर
(Mumbai Local Mega Block) मध्य आणि हार्बर रेल्वेने रविवारी देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी नियोजित ब्लॉक जाहीर केला असून त्यामुळे अनेक लोकल गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनानुसार या काळात ट्रॅक व सिग्नलच्या देखभालीची महत्त्वाची कामे करण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी या दरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत ब्लॉक असेल. या कालावधीत CSMT ते पनवेल व बेलापूरकडे जाणाऱ्या तसेच परतीच्या दिशेच्या गाड्या रद्द राहणार आहेत. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल या दरम्यानच्या लोकल्स देखील बंद राहतील. मात्र CSMT ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरूळ मार्गावरील सेवा नियमित सुरु राहणार आहे.
मध्य रेल्वेव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेनेही वसई रोड ते विरारदरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री 12.15 पासून रविवारी पहाटे 4.15 पर्यंत राहील. या दरम्यान धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल्स उशिराने धावतील. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा ब्लॉक रात्रीच्या वेळेतच असल्यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल. रेल्वे प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपले वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.