थोडक्यात
मुंबई मेट्रो ३ ला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला
मुंबई मेट्रो-3 प्रवाशांसाठी बातमी
आता स्थानकांवर मिळणार मोफत Wi-Fi
(Mumbai Metro 3) मुंबई मेट्रो ३ ला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. भूमीगत मेट्रो ३ पूर्ण मार्गावर सुरू झाल्यावर पहिल्याच दिवशी दीड लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मिळत आहे. मात्र अनेक समस्या प्रवाशांना येत होत्या.
मुंबई मेट्रो लाईन 3च्या अंतिम टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र या अंतिम टप्प्याच्या 11 स्थानकांमध्ये नेटवर्कचा मोठा प्रॉब्लेम प्रवाशांना सहन करावा लागत होता. तिकीट काढताना देखील प्रवाशांना अडचणी येत होत्या. मात्र मेट्रो प्रशासनाने एक नवीन निर्णय घेतला असून मेट्रो रेल्वे स्थानकांवर वायफाय ची सुविधा मेट्रो प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे.
मुंबई मेट्रो लाईन 3 मार्ग पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर, आता या मार्गावरील प्रवाशांसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो-3 च्या सर्व स्थानकांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे. मेट्रो-3 हा संपूर्णपणे भूमिगत मार्ग असल्याने प्रवाशांना आतापर्यंत मोबाईल नेटवर्कच्या अडचणी जाणवत होत्या. यामुळे विशेषतः ई-तिकीट काढताना अडचण निर्माण होत होती. याच पार्श्वभूमीवर एमएमआरसीने हे पाऊल उचलले आहे.
प्रवाशांना आता स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी ‘Metro Connect 3’ या अधिकृत मोबाईल ॲपवर लॉगिन करून सहजपणे ई-तिकीट काढता येणार आहे. यामुळे तिकीट खरेदीचा वेळ वाचणार असून, अनेकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणीही टळणार आहेत. मेट्रो-3 मार्गावर दररोज सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करत आहेत. अशा वेळी वायफायसारखी सुविधा प्रवास अधिक सुलभ आणि आधुनिक बनविण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे. एमएमआरसीने घेतलेला हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, मेट्रोचा प्रवास केवळ जलदच नव्हे, तर तांत्रिकदृष्ट्याही सुसज्ज आणि त्रासमुक्त होणार आहे.