थोडक्यात
मोनोरेल सेवा आजपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद
वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे ही सेवा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतलाय
मात्र नवीन मोनोरेल कधी सुरू होईल याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही आहे.
(Mumbai Monorail) मुंबई मोनोरेलच्या सेवेत वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ही सेवा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
मोनोरेलमध्ये अनेकवेळा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. 19 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसात म्हैसूर कॉलनीजवळ शेकडो प्रवासी अडकून पडले होते. त्याच दिवशी आचार्य अत्रे नगर स्थानकाजवळ आणखी एका गाडीत 200 प्रवासी अडकल्याचा प्रसंग घडला. वडाळा ते सात रस्ता या मार्गावर धावणारी मोनोरेल सध्या प्रवाशांसाठी एकमेव पर्याय होती.
मात्र अलीकडेच 15 सप्टेंबर रोजी एण्टॉप हिल आणि जीटीबीएन स्थानकादरम्यान गाडी अडकली होती, त्यावेळी 17 प्रवाशांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सेवा थांबवून मोठ्या प्रमाणावर देखभाल आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या काळात मोनोरेल मार्गावर नवे तंत्रज्ञान बसवले जाणार असून CBTC सिग्नलिंग प्रणालीचा समावेश होणार आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, ट्रेन डिटेक्शन सिस्टीम आणि इतर अत्याधुनिक यंत्रणांची चाचणी सुरू आहे. या कामांमुळे भविष्यात प्रवाशांची सुरक्षितता वाढेल आणि सेवा अधिक विश्वासार्ह होईल, असा एमएमआरडीएचा दावा आहे. नवीन मोनोरेल पूर्णपणे भारतीय बनावटीची असून, त्यात ३६०-डिग्री सीसीटीव्ही कॅमेरे, ब्लॅक बॉक्स सिस्टम, चार्जिंग पॉईंट्स आणि वायफाय सुविधा उपलब्ध असल्याची माहिती मिळत आहे. मात्र नवीन मोनोरेल कधी सुरू होईल याबाबत कोणतीही माहिती मिळत नाही आहे.