(Mumbai Rain ) राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. सकाळपासून मुंबईत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पावसाची संततधार सुरु असून रेल्वेवर देखील याचा परिणाम दिसून येत असून मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशीराने सुरू आहे. सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना या पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
वडाळा, सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता आणि माटुंगा या परिसरात जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवरही पाणी साचायला सुरुवात झाली असून मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर रेल्वे स्थानकातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.