मुंबई विद्यापीठाला नॅकचा A++ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यासाठीची घोषणा नॅककडून आज अधिकृतरित्या करण्यात आली. यासाठी विद्यापीठाला एकूण 3.65 गुण मिळाले आहेत. हा दर्जा मिळवण्यासाठी राज्यातील इतर विद्यापीठांच्या एकूण तुलनेत सर्वाधिक असे गुण मिळवले आहेत.
मुंबई विद्यापीठाला नॅकचा दर्जा मिळाल्याने विद्यापीठातील व्यवस्थापन सदस्य, सिनेट सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी त्यासोबतच सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या या दर्जाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. हा दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठातील अनेक महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम, संशोधनाचे कामकाज त्यासोबतच विविध प्रकारच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जामध्ये ही मोठी सुधारणा होण्यास मदत मिळणार असल्याचा विश्वास व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून व्यक्त केला जात आहे.
मागील पाच वर्षांपासून मुंबई विद्यापीठाला नॅकचा दर्जा मिळाला नव्हता. यामुळे विद्यापीठातील अनेक शैक्षणिक उपक्रमांना खीळ बसली होती. तर दुसरीकडे विद्यापीठात असलेल्या दूर आणि मुक्त अध्ययन संस्थेलाही याचा मोठा फटका बसला होता. मात्र आता हा दर्जा मिळाल्याने विद्यापीठातील संशोधन प्रकल्प, विविध प्रकारचे अनुदानाचे प्रकल्प यासोबतच विद्यापीठात इतर विद्यापीठांच्या करारावर सोबतच शैक्षणिक देवाण-घेवाण असे अनेक मार्ग यापुढे खुले होणार असून हा दर्जा मिळाल्याने मुंबई विद्यापीठ हे पुन्हा एकदा देशातील नामांकित विद्यापीठाच्या श्रेणीत जाऊन बसेल असा विश्वास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांनी व्यक्त केला.