माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणावरून काँग्रेसही आता आक्रमक झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते खोटे बोलण्यात माहीर असल्याची टीका, नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. फडणवीस हे विधान भवनातही खोटं बोलतात, बाहेर पण बोलतात, अशी टीका करतानाच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आऱोपही त्यांनी केला. महागाई, लस आणि बेरोजगारी याकडे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपचा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली.
विविध प्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतलेली भूमिका संशयास्पद आहे. राजभवन हे आता भाजप कार्यालय झाले आहे, अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केली. राज्यातील घडामोडींबाबत भाजपा नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. यासंदर्भात ते म्हणाले, त्यांनी काय रिपोर्ट द्यावा, हा त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राला बदनाम करण्याचा जो ठेका घेतला आहे, त्यासाठी जनता माफ करणार नाही, असे त्यांनी सुनावले.