डीआरडीओकडून मान्यता मिळालेलं २ डायोक्सी डी ग्लुकोज हे कोरोना प्रतिबंधक औषध पूर्णपणे सुरक्षित असून त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते, असं मत वैज्ञानिक डॉ. सुधीर चंदना यांनी आज व्यक्त केलं आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या इन्स्टिट्युट ऑफ न्युक्लिअर मेडिसीन अँड अलाईड सायन्सेस या प्रयोगशाळेने हैद्राबादच्या डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेच्या संयुक्त विद्यमाने हे औषध तयार करण्यात आलं आहे. डॉ. चंदना हे याच प्रयोगशाळेत काम करणारे वैज्ञानिक आहेत.
हे औषध करोना रुग्ण बरे होण्यामध्ये परिणामकारक ठरत असल्याचं या औषधाच्या वैद्यकीय चाचण्यांमधून समोर आलं आहे. चाचण्यांच्या दुसऱ्या टप्प्यात ११० रुग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात आला, तर तिसऱ्या टप्प्यात २२० रुग्णांवर हा प्रयोग करण्यात आला. नेहमीच्या कोरोना उपचारांपेक्षा हे औषध वापरुन केलेले उपचार अधिक परिणामकारक असल्याचं समोर आल्याची माहिती डॉ. चंदना यांनी दिली आहे.