ताज्या बातम्या

पुण्यात 111 पाकिस्तानी नागरिक; तीन जणांनी घेतलं 'एक्झिट लेटर', उर्वरित 108 नागरिकांच काय ?

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर लक्ष केंद्रित केले असून, ४८ तासांच्या आत भारतातून बाहेर पडण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

Published by : Team Lokshahi

कश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवार, २२ एप्रिल रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यानंतर केंद्र सरकारने देशभरात सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांवर लक्ष केंद्रित केले असून, ४८ तासांच्या आत भारतातून बाहेर पडण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत.

सध्या पुणे शहरात सुमारे १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे समोर आले असून, त्यामध्ये दीर्घ मुदतीच्या (Long Term Visa) व्हिसावर आलेल्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. याशिवाय काही नागरिक व्हिजिटर व्हिसावर देखील आलेले आहेत. बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क या परिसरांमध्ये हे नागरिक वास्तव्य करत असल्याची नोंद आहे.

या पार्श्वभूमीवर गुरुवार, २४ एप्रिल रोजी तीन पाकिस्तानी नागरिकांनी पुणे पोलिसांकडून आवश्यक 'एक्झिट लेटर' घेतले असून, त्यांनी पुणे शहर सोडल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

भारत सरकारने अटारी- वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गाने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १ मे २०२५ पर्यंत मायदेशात परतण्यास सांगण्यात आले आहे.

भारतात येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना त्यांच्या वास्तव्यासाठी संबंधित पोलीस आयुक्तालय किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक असते. एकाच शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करताना देखील अशा बदलांची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे. स्थानिक पोलीस यंत्रणा वेळोवेळी त्यांच्या वास्तव्याची व हेतूची पडताळणी करतात.

पुणे शहरात दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेल्या नागरिकांमध्ये ३५ पुरुष आणि ५६ महिलांचा समावेश आहे, तर २० पाकिस्तानी नागरिक व्हिजिटर व्हिसावर आलेले आहेत. दीर्घ मुदतीचा व्हिसा प्रामुख्याने ५ वर्षांसाठी दिला जातो. त्यानंतर दोन वर्षांनी नूतनीकरण करण्याची प्रक्रिया असते. केंद्र सरकारने आदेश दिले असले तरी, अद्याप परराष्ट्र विभागाकडून स्पष्ट कार्यपद्धती (SOP) प्राप्त झालेली नाही, असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा