राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना बुलढाणा जिल्ह्यात 12 वर्षीय शाळकरी मुलाने उष्माघातामुळे आपला जीव गमावला आहे. संस्कार सोनटक्के असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. वाढत्या उष्णतेमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर आणि मालेगाव येथे 40 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे.
संस्कार सोनटक्के शेगावच्या संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये शिक्षण घेत होता. तो इयत्ता सहावीत होता. संस्कारला उन्हाचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली. त्याला उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी उन्हात फिरणे टाळावे आणि भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा भागात प्रशासनाने उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे.