बांगलादेश हवाई दलाचे प्रशिक्षण विमान सोमवार, 21 जुलै रोजी राजधानी ढाका येथील एका महाविद्यालय आणि शाळेच्या आवारात कोसळल्याने झालेल्या अपघातात 19 जणांचा मृत्यू झाला असून 164 जण जखमी झाले असल्याची माहिती लष्करी प्रवक्त्यांनी दिली. यामध्ये 16 विद्यार्थी, दोन शिक्षक आणि एका पायलटचा समावेश आहे.
एफ-7 बीजीआय जेटने दुपारी 1.06 वाजता (0706 जीएमटी) ढाका येथील कुर्मिटोला येथील बांगलादेश हवाई दलाच्या तळावरून नियमित प्रशिक्षण मोहिमेसाठी उड्डाण केले. परंतु त्यात यांत्रिक बिघाड झाला, असे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल सामी उद दौला चौधरी यांनी सांगितले.
"वैमानिकाने दाट लोकवस्तीच्या भागांपासून विमान दूर वळवण्याचा धाडसी प्रयत्न केला. त्याच्या सर्वोत्तम प्रयत्नांना न जुमानता, विमान माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या दोन मजली इमारतीवर कोसळले," असे ते म्हणाले. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पायलटचाही समावेश असल्याचे लष्कराने सांगितले. तसेच या घटनेचे कारण तपासण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जेन्स इन्फॉर्मेशन ग्रुपच्या मते, F-7 BGI हा चीनच्या चेंगडू J-7/F-7 विमान कुटुंबातील अंतिम आणि सर्वात प्रगत प्रकार आहे. बांगलादेशने 2011 मध्ये 16 विमानांसाठी करार केला होता आणि 2013 पर्यंत त्याची डिलिव्हरी पूर्ण झाली. चेंगडू एफ-7 हे सोव्हिएत मिग-21 चे परवाना-निर्मित आवृत्ती आहे.
हेही वाचा