मुंबईत पावसाची अनियमितता काही नवीन नाही. कधी धो-धो, कधी रिमझिम तर कधी वादळी वाऱ्यासह बरसणाऱ्या मुंबईच्या पावसातील अनेक कटू-गोड आठवणी आहेत. मात्र याच पावसानं मुंबईतील एके दिवशी मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळवलं. 26 जुलै 2005 रोजी पडलेल्या विक्रमी पावसानं मुंबईची तुंबई केली. या दिवसाला आज 20 वर्ष पूर्ण झाली आहे. तरीही 26 जुलै तो दिवस आठवला की आजही जीवाचा थरकाप उडतो.
26 जुलै 2005 रोजी झालेल्या पावसामुळे मुंबई थांबली होती. त्यावेळी मुंबईकरांनी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी करणारा पाऊस अनुभवला होता. या पावसामध्ये एक हजाराहून अधिक मुंबईकरांनी आपला जीव गमावला होता. तर तब्बल 15 हजारांच्या आसपास घरं उद्ध्वस्त झाली होती. त्यावेळी नागरिक अक्षरशः रस्त्यावर अडकले होते. अगदी खांद्या-गळ्याएवढ्या पाण्यातून रस्त्याच्या मधोमध चालणाऱ्या नागरिकांची ती दृश्य आजही विचलित करतात. त्या दिवशी दिवसभर पडणाऱ्या पावसाने विक्रम केला. एकाच दिवसात तब्बल 944 मिमी पाऊस पडला. मुंबईच्या इतिहासातील गेल्या 100 वर्षांतील सर्वात मोठा पाऊस होता.
त्या दिवशी ढग फुटल्यासारखा पाऊस कोसळत होता. कधीही न थांबणारी मुंबई 26 जुलै 2005 रोजी मात्र स्तब्ध झाली होती. मुंबईची लोकल, बस या सर्वच ठिकाणी नागरिक अडकून पडले होते. मुंबईच्या या पावसात जवळपास साडेपाच अब्ज रुपयांचं नुकसान झाल्याचं एका आकडेवारीतून स्पष्ट झालं. या पावसानंतर राज्य सरकारने त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये, यासाठी उपाययोजना करण्यासाठी पर्यावरणवादी अभ्यासक डॉ. माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने 2006 साली आपला अहवाल दिला.
हेही वाचा