ताज्या बातम्या

Pune Kundeshwar Accident : कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या पिकअपचा तब्बल 5-6 वेळा पलटी होऊन भीषण अपघात; 25 ते 30 महिला भाविक जखमी

कुंडेश्वर दर्शनाला जात असताना नागमोडी वळणावर पिकअप जीप पलटी झाल्याने तब्बल 25 ते 30 महिला भाविक जखमी झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

Published by : Team Lokshahi

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारनिमित्त जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांत भाविकांची मोठी गर्दी उसळली असताना, पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आज दुपारी भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. कुंडेश्वर दर्शनाला जात असताना नागमोडी वळणावर पिकअप जीप पलटी झाल्याने तब्बल 25 ते 30 महिला भाविक जखमी झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच दिवशी सकाळी कल्याण-पुणे एसटी बसचे चाक निखळण्याचीही घटना घडली असून यात 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्याचसोबत 6 ते 10 महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरासह विविध शिवमंदिरांकडे भाविकांची मोठी रांग लागली होती. खेड तालुक्यातील कुंडेश्वर मंदिरही याच भाविक आकर्षणांपैकी एक आहे. आज दुपारी साधारण सव्वा एक वाजताच्या सुमारास भाविक महिलांचा गट पिकअप जीपमधून कुंडेश्वरकडे निघाला होता. घाटातील नागमोडी वळणावर चढ चढताना गाडी अचानक रिव्हर्सला गेली आणि नियंत्रण सुटल्याने पिकअप 5 ते 6 वेळा पलटी झाली.

अपघातानंतर घटनास्थळी एकच आरडाओरड झाली. स्थानिक ग्रामस्थ आणि इतर भाविकांनी तत्काळ धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पोलिसांनीही घटनास्थळी हजेरी लावून मदतकार्य केले.

दरम्यान, याच दिवशी सकाळी कल्याणवरून माळशेजमार्गे पुणे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला मोठा अपघात टळला. कल्याणपासून काही अंतरावर बसचे पुढील चाक अचानक निखळले. त्या वेळी बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी होते. चाक निखळल्याने बस रस्त्याच्या कडेला थांबली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या माहितीनुसार, बस माळशेज घाट गाठण्यापूर्वीच थांबल्यामुळे गंभीर अनर्थ टळला. जर हा प्रकार घाटात झाला असता, तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता होती. या दुर्घटनेत 3 ते 4 प्रवाशांच्या डोक्याला मार लागून ते किरकोळ जखमी झाले. नंतर प्रवाशांना दुसऱ्या एसटी बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

श्रावण महिन्यात भाविकांची वाढती गर्दी आणि घाटातील धोकादायक वळणे यामुळे दरवर्षी अशा घटना समोर येतात. प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून वाहनांची तपासणी, ड्रायव्हरची दक्षता आणि रस्त्यावरील सुरक्षा उपाय यावर भर देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Actor Kishor Kadam :कवी सौमित्रच्या घरावर संकट; मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे धाव घेतली

Sanjay Gaikwad On UBT Andolan : "मी ओरिजनल, माझी कॉपी उबाठाच्या ..." ; आमदार संजय गायकवाडांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Kapil Sharma: 'त्या' घटनेनंतर कपिल शर्माच्या सुरक्षेत वाढ

Latest Marathi News Update live : पुण्यातील खेडमध्ये कुंडेश्वराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात