थोडक्यात
रशियाच्या पूर्व किनाऱ्याजवळील कामचटका द्वीपकल्पात शुक्रवारी सकाळी भीषण भूकंप
भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली
भूकंपानंतर हवाई येथील पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने त्सुनामीचा इशारा
(Earthquake) रशियाच्या पूर्व किनाऱ्याजवळील कामचटका द्वीपकल्पात शुक्रवारी सकाळी भीषण भूकंप नोंदवला गेला. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार (USGS) या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. सकाळी सुमारे आठ वाजून सात मिनिटांनी जमिनीतून आलेल्या या धक्क्यामुळे किनारी भागात मोठी धास्ती निर्माण झाली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोव्स्क-कामचटस्की या भागात सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. यापूर्वीही गेल्या काही दिवसांत या भागात 7.1 तीव्रतेचे धक्के जाणवले होते. सातत्याने होत असलेल्या हालचालींमुळे कामचटका हा जगातील सर्वाधिक संवेदनशील भूकंप प्रवण प्रदेशांपैकी एक मानला जातो.
भूकंपानंतर हवाई येथील पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने त्सुनामीचा इशारा दिला आहे. स्थानिक प्रशासनाने किनारी गावांमधील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेसाठी उंच ठिकाणी हलविण्याचे आवाहन केले आहे. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जुलै महिन्यात याच भागात 8.8 रिश्टर तीव्रतेचा मोठा भूकंप झाला होता. त्यामुळे आता पुन्हा झालेल्या या भूकंपामुळे पॅसिफिक प्रदेशात संभाव्य धोका निर्माण झाला असून सततची हालचाल चिंतेचा विषय ठरत आहे.