हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात रविवारी सकाळी पायऱ्यांवर झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 8 भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेक भाविक जखमी झाले आहेत. सकाळी अंदाजे 9 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती, त्याच दरम्यान विजेच्या धोक्याची अफवा पसरल्यामुळे गर्दीत घबराट उडाली आणि अफरातफरीत चेंगराचेंगरी झाली.
गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, “घटनास्थळी मी स्वतः जात आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, सविस्तर माहितीची प्रतीक्षा आहे.” दरम्यान, पोलिस आयजी (कायदा व सुव्यवस्था) निलेश भारणे यांनी स्पष्ट केले की, अफवेमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आणि त्यामुळे एकच कल्लोळ उडाला. पोलीस व बचावपथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.
जखमी भाविकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सोशल मीडियावरून काही व्हिडिओ व्हायरल झाले, त्यात रुग्णालयात सुरू असलेले उपचार दृश्य दिसून येतात. मनसा देवी मंदिर हे हरिद्वारमधील पवित्र पंचतीर्थांपैकी एक असून, शिवालिक पर्वतरांगेतील 500 फूट उंचीवर वसलेले आहे. श्रावण महिना सुरू असल्याने मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झालेली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर लिहिले, “हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. SDRF, पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, मदत व बचाव कार्य सुरू आहे. मी सतत प्रशासनाच्या संपर्कात आहे आणि सर्व भाविकांचे जीवन सुरक्षित राहावे यासाठी प्रार्थना करतो.” स्थानिक प्रशासनाने नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. मंदिर परिसरात अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.