ध्वनीप्रदूषण ही केवळ आरोग्याची नव्हे तर सामाजिक आणि पर्यावरणीय हानी करणारी गंभीर समस्या आहे. दुचाकींवरील बेकायदेशीर आणि कानठळ्या बसवणारे मोडिफाइड सायलेन्सर शहरातील नागरिकांच्या त्रासाचे मुख्य कारण बनले होते. या समस्येवर पोलिसांनी केवळ दंडात्मक कारवाई न करता, एक प्रेरणादायी आणि नावीन्यपूर्ण पद्धतीने जनजागृती करणारा उपक्रम राबवला आहे.
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी सुरु केलेल्या मोहीमेद्वारे जप्त करण्यात आलेल्या 300 मोडिफाइड सायलेन्सरपासून एक 17 फूट उंच रॉकेटाची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही प्रतिकृती क्रांती चौकात स्थापन करण्यात आली असून, नागरिकांचे लक्ष वेधून घेणारी आणि समाजाला ध्वनीप्रदूषणा विरोधातील संदेश देणारी एक महत्त्वाची कलाकृती ठरली आहे. या संकल्पनेची मुळे उपायुक्त नितीन बगाटे यांच्या कल्पकतेत दडलेली आहेत. त्यांच्या पुढाकाराने आणि उद्योग समूहांच्या CSR निधीतून अवघ्या ०२ महिन्यांत हे रॉकेट उभारण्यात आले. हे केवळ कलात्मक सर्जन नाही, तर 'कायदा + क्रिएटिव्हिटी = जनजागृती' असा अभिनव प्रयोग आहे.
रॉकेटचे प्रतीकात्मक अर्थ
या रॉकेटाचा उद्देश केवळ लोकांचे लक्ष वेधणे नसून, शांततेकडे झेप घेणाऱ्या समाजाचे प्रतीक म्हणून त्याची उभारणी करण्यात आली आहे. बेकायदेशीर आणि त्रासदायक आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा शेवट अशा सकारात्मक माध्यमातून केल्याने जनमानसात ध्वनीप्रदूषणाविरोधातील विचार अधिक ठळकपणे मांडला गेला आहे.
पोलिसांकडून नियमित कारवाई सुरू असतानाच, अशा उपक्रमामुळे तरुण पिढीपर्यंत पोहोचणारा संदेश अधिक प्रभावी होतो. रस्त्यावर गोंगाट करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे ही एक गोष्ट आहे. पण त्या कारवाईतून निर्माण होणारे कलात्मक आणि विचारप्रवृत्त करणारे रूपांतर हे खरे सामाजिक परिवर्तनाचे पाऊल आहे.