नवी मुंबईतील जुईनगरमधील एका सोसायटीत कौटुंबिक नैराश्यामुळे एका उच्चशिक्षित कॉम्पुटर प्रोग्रामर असलेल्या 55 वर्षीय अनुप नायर यांनी स्वतःला तब्बल पाच वर्ष स्वतःच्याच घरी कोंडून घेतले. शेजाऱ्यांना याची माहिती लागताच तात्काळ त्यांनी एका सामाजिक संस्थेला याबाबत माहिती दिली. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तात्कळ अनुप नायर यांची सुटका केली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
नवी मुंबईतील एका 55 वर्षीय अनुप नायर नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने नैराश्य आणि एकाकीपणामुळे, स्वतःला 5 वर्षांसाठी घरात कोंडून घेतले होते. 2020 मध्ये त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यांची आई पूर्णिमा नायर या इंडियन एअरफोर्स मध्ये कामाला होत्या. तर वडील व्ही.पी. कुट्टीकृष्णन नायर हे टाटा हॉस्पिटलमध्ये कामाला होते. त्यांच्या मोठ्या भावाने 20 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. घरातील तिन्ही सदस्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नायर हे मानसिक तणावाखाली होते. या सगळ्याचा एकत्रित परिणाम त्यांच्या मनावर झाला. त्यांना त्यांच्या मृत्यूची भीती वाटू लागली.
त्यामुळे त्यांना आलेल्या नैराश्येमधून त्यांनी 2020 ते 2025 अशी तब्बल 5 वर्षे स्वतःला घरामध्येच कोंडून घेतलं. ते घरातून बाहेर पडत नव्हते. फक्त ऑनलाइन जेवणाच्या ऑर्डरवर ते जगत होते. त्यातच त्यांच्या पायाला संसर्ग झाला होता आणि ते खूप अशक्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या घरात कचऱ्याचे, मानवी विष्ठेचे, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. ऑनलाईन ऑर्डर केलेले अन्न, कचऱ्याचा ढीग यामुळे त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागली. याबाबत शेजारच्यांना संशय आल्यावर त्यांनी याबाबत शोध घेतला.
त्यात ते फक्त ऑनलाईन ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीच्याच संपर्कात असल्याचे दिसून आले. त्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत एका सामाजिक संस्थेला माहिती दिली. सोशल अँड इन्व्हजिलिकल असोसिएशन फॉर लव्ह या सामाजिक संस्थेने तात्काळ त्यांच्या घरी भेट देऊन अनुप नायर यांना त्या घरातून बाहेर काढले. आणि त्यांच्यावर उपचार सुरु केले. सध्या त्यांना पनवेलमधील शिल आश्रमात ठेवण्यात आले असून आता त्यांची आरोग्य स्थिती स्थिर आहे.