राज्यासह देशभरातील वातावरणात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे पाऊस, दुसरीकडे थंडी तर काही ठिकाणी उकाडा, असे तिन्ही हंगाम एकाच वेळी अनुभवायला मिळत आहेत. या हवामान बदलाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून सर्दी, ताप, खोकला तसेच श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासूनच श्वसनविकार असलेल्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे.
याच पार्श्वभूमीवर देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण हा गंभीर प्रश्न बनला आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत असल्या तरीही वायू प्रदूषणाची पातळी अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना मास्क घालून घराबाहेर पडावे लागत आहे. प्रदूषित हवेमुळे डोळ्यांची जळजळ, घसा दुखणे आणि श्वसनास त्रास होण्याच्या तक्रारी वाढत आहेत.
दुसरीकडे, देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत असून तापमानात मोठी घट झाली आहे. अनेक ठिकाणी पारा घसरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत देशभरात हवामानात चढउतार कायम राहणार असून काही भागांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. राज्यातही पुढील दोन ते तीन दिवसांत थंडी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
डिसेंबर महिन्यात राज्यात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत होती. मात्र, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तुलनेने थंडी कमी असल्याचे चित्र होते. आता पुन्हा एकदा थंडी परतल्याचे संकेत मिळत असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. थंडी अचानक वाढल्यास सर्दी-खोकल्याच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत किमान आणि कमाल तापमानात फारसा बदल होणार नसल्याने शहरात गारठा कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात किमान तापमानात वाढ झाली होती, मात्र आता उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरीमुळे पुन्हा थंडी वाढली आहे.
राज्यातील काही भागांमध्ये नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. निफाड येथे किमान तापमान 7.9 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले असून, गोंदिया येथे 9.8 अंश तर धुळ्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात गारठ्याची तीव्रता सतत कमी-जास्त होत असल्याने नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.