लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) ई-केवायसी प्रक्रियेमुळे थांबलेला तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली असून, पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट ४५०० रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी थेट आर्थिक मदत देणारी महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा सामाजिक आणि राजकीय परिणामही मोठ्या प्रमाणावर दिसून आला असून, विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला याचा थेट फायदा झाल्याचे चित्र आहे.
मात्र, ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेतील अडचणींमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते अनेक लाभार्थी महिलांना मिळाले नव्हते. काही महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने संताप व्यक्त केला होता. अनेक ठिकाणी महिलांनी संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन तक्रारी केल्या, तर काही भागांमध्ये महिलांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलनही केले. या प्रकरणामुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने थकबाकी प्रकरणांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. काही ठिकाणी नियम व अटी डावलून अर्ज सादर केल्याचे प्रकार समोर आल्याने सध्या अशा अर्जांची पडताळणी सुरू आहे. संबंधित महिलांच्या घरी जाऊन माहिती तपासण्याचे निर्देश देण्यात आले असून, पात्र आणि अपात्र लाभार्थी यामध्ये स्पष्टता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अशा परिस्थितीत राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्यात येणार आहे. यानुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट ४५०० रुपये जमा होतील. ज्यांना याआधी दोन महिन्यांचे हप्ते मिळालेले नाहीत, त्यांना पूर्ण ४५०० रुपये मिळणार आहेत. तर ज्या महिलांना आधीच दोन हप्ते मिळाले आहेत, त्यांना जानेवारी महिन्याचा एकच १५०० रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. ही माहिती एका मराठी वृत्तसंस्थेच्या माध्यमातून समोर आली आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या भविष्यातील रकमेबाबतही चर्चा सुरू आहे. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार या योजनेचा मासिक हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्पष्ट संकेत दिले आहेत. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, त्यांच्या दैनंदिन गरजांना हातभार लागणार आहे.