मुंबईत मशिदींवरील अजानच्या आवाजावरून निर्माण झालेल्या वादाला नवे परिमाण लाभले असून, राष्ट्रवादी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतीच आज सकाळी बैठक घेतली. या बैठकीत अबू आझमी यांनी अजानचा विषय घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत खासदार अबू आझमी यांनी उपस्थित राहून अजानच्या आवाजावर लावले जाणारे निर्बंध हे केवळ महाराष्ट्रापुरतेच का, असा थेट सवाल उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली.
अबू आझमी म्हणाले, "संपूर्ण देशभरात अजान सुरू असते, मात्र अशा प्रकारचे निर्बंध केवळ महाराष्ट्रातच का लागू केले जातात? हे नियम फक्त इथल्याच मुस्लिम समाजासाठी का? आमच्यावर अन्याय का केला जातो?" या शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत त्यांनी हेही सांगितले की, काहीजण मुद्दामहून हे प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन तक्रारी केल्याचे त्यांनी नमूद केले.
"मशिदीसमोर उभं राहून चिडवणे, पोलिस ठाण्यांमध्ये जाऊन आरडाओरड करणे, हा सर्व प्रकार मुस्लिम समाजाविरोधात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न आहे," असा आरोपही त्यांनी यावेळी केला. "संपूर्ण देशात अजान सुरू असताना फक्त मुंबईतच अडचण का निर्माण केली जाते? हे केवळ नियमांचं पालन नाही, तर एका समाजाविरोधात हेतुपुरस्सर वातावरण निर्मिती आहे," असे ते म्हणाले.
या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाची भूमिका ऐकून घेतली असून, पोलिस प्रशासनाशी चर्चा करून यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रवादी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनीही हे प्रकरण शांततेत मार्गी लावण्याचे आवाहन करत, प्रशासनाने सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.