मुंबईजवळील शहापूरमध्ये एक ड्रोन कोसळल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन हा ड्रोन ताब्यात घेतला आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाने वातावरण आहे. भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानचे तीन तेरा वाजले. तर पाकिस्तानी सैन्याने भारतावर ड्रोन हल्ले केले. सीमेवर झालेल्या या ३ दिवसांच्या युद्धामध्ये ड्रोन हल्ला हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच शहापूरमध्ये ड्रोन आढळल्याने सर्वांमध्येच भीती निर्माण झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ड्रोन ताब्यात घेतला. अखेर हा ड्रोन नेमका कुणाचा होता याची माहिती आता समोर आली आहे.
कसारा जवळील फुगाळे गावातील आघानवाडी गावात एका डोंगरावर ड्रोन घिरट्या घालत असल्याचं निदर्शनास आलं. आज, गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक काही क्षणात हा ड्रोन डोंगरावर कोसळला. गावात खेळणाऱ्या मुलांनी हा ड्रोन कोसळताना पाहिला होता. एका झाडावर हा ड्रोन कोसळला होता. गावकऱ्यांनी हा ड्रोन झाडावरून खाली उतरवला आणि खाली वस्तीजवळ घेऊन आले. गावाचे सरपंच जिवा भला यांनी कसारा पोलीस स्टेशनला ड्रोनबद्दल माहिती दिली.
पोलिसांनी ड्रोनची पाहणी केल्यानंतर हा ड्रोन जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी उडवण्यात आला होता, अशी माहिती समोर आली. जलसंपदा विभागाकडून वाडा तालुक्यात सर्व्हे सुरू आहे. पायोनियर इन्फ्रा या ठेकेदार कंपनीने ड्रोनच्या मदतीने सर्व्हे सुरू केला होता. पण सर्व्हे सुरू असताना अचानक ड्रोन भरकटला आणि तो शहापूर तालुक्यातील फुगाळे आघानवाडी परिसरात पोहोचला. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो डोंगरावर एक झाडावर कोसळला, अशी माहिती पायोनियर कंपनीने पोलिसांना दिली.