पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील केडगावमधील मोरे वस्ती या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान 5 ते 6 जणांच्या टोळक्याने चोरी करण्याच्या उद्देशाने एका शेतकऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले आहेत. यात मोरे वस्तीमधील 60 वर्षीय पोपट मोरे हे शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. तर याच परिसरातील देशमुख भागात अशोक देशमुख यांचे घरदेखील चोरट्यांनी फोडले असून दोन तोळे सोने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. तसेच काकडे वस्तीमधील नवनाथ देशमुख यांच्या बंगल्याला बाहेरून कडी लावण्याचा प्रकार घडला आहे.
पोपट मोरे हे आपल्या राहत्या घरासमोर झोपलेले असताना अचानक आलेल्या या चोरट्यांनी पोपट मोरे यांच्यावर कोयत्याने वार केला. तर पोपट मोरे यांचे भाऊ बाळासाहेब मोरे यांना देखील चोरट्यांनी गळ्याला चाकू लावत धमकावले. आरडाओरडा झाल्याने चोरटे पसार झाले. यातील जखमी पोपट मोरे यांच्यावर केडगावमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.