नायगाव पूर्व येथील नवकार इमारतीत मंगळवारी रात्री घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. बाराव्या मजल्यावरून खाली पडून अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नवकार इमारतीच्या फेज वनमधील ए-3 ए विंगमध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबियांच्या घरी अन्विका नावाची मुलगी रात्रीच्या सुमारास आली होती.
खेळत असताना ती चप्पल ठेवण्याच्या स्टँडवर बसली होती. त्या स्टँडजवळच असलेली खिडकी उघडी होती आणि ती कोणतीही सुरक्षा जाळी नसल्यामुळे अन्विकाचा तोल जाऊन ती थेट बाराव्या मजल्यावरून खाली कोसळली. घटनेनंतर तातडीने तिला जवळच्या सर डी. एम. पेटिट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू आधीच झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची नोंद नायगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त करत सांगितले की, नवकार इमारतींमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना अत्यंत तोकड्या आहेत. अनेक खिडक्यांना सुरक्षेची जाळी नाही. जर त्या खिडकीला जाळी असती, तर अन्विकाचा जीव वाचला असता, असे नागरिकांचे म्हणणे आहे.