मुंबईसह राज्यातील गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाली आहेत. ‘ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम’, ‘गोविंदा रे… गोपाळा’, ‘बोल बजरंग बली की जय’ अशा घोषणा देत मानवी मनोऱ्यांचा रोमहर्षक थरार आज अनुभवायला मिळणार आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकं सकाळपासून सज्ज झाली आहेत.
राजकीय पक्षांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून लाखो रुपयांची बक्षिसे आहेत. अनेक ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये आनंद असतो. मुंबईसह ठाणे आणि राज्यामध्ये इतर ठिकाणी दहीहंडीचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो.
अशातच आता सणाला गालबोट लागलं आहे. मुंबई मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची दु:खत घटना घडल्याचं समोर आलं आहे. दही हंडीचा दोर बांधत असताना खाली पडून ही दुर्घना घडली आहे. 32 वर्षांच्या जगमोहन शिवकिरन चौधरी असं या मृत व्यक्तीचं नाव असून लगेचच त्याला गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र भर्ती करण्याच्या पूर्वीच डॉकट्रानी त्याला मृत घोषित केले. त्याचसोबत दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 30 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.