ताज्या बातम्या

BMC: बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना विनम्र आवाहन

मुंबई महानगरात 'घरोघरी तिरंगा' अभियान अंतर्गत मुंबईकरांनी आपल्या घरांवर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिवस अधिक संस्मरणीय केला.

Published by : Dhanshree Shintre

दिलीप राठोड | मुंबई: मुंबई महानगरात 'घरोघरी तिरंगा' अभियान अंतर्गत मुंबईकरांनी आपल्या घरांवर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिवस अधिक संस्मरणीय केला. अभियानाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत. अभियान कालावधी संपला आहे, तथापि, नागरिकांनी संस्मरणीय आठवण म्हणून राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक जपून ठेवावा, असे विनम्र आवाहनही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शासनाच्या निर्देशानुसार, दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत देशभरात 'घरोघरी तिरंगा' (हर घर तिरंगा) अभियान राबविण्यात आले. त्यासाठी दिनांक 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत निरनिराळे उपक्रम राबवण्यात आले. या अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मुंबई महानगरात तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा शपथ, तिरंगा मेळा, मानवंदना असे भरगच्च उपक्रम संपन्न झाले.

सर्व मुंबईकरांनी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट कालावधीदरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. नागरिकांच्या सोयीसाठी टपाल कार्यालये, विभाग कार्यालय (वॉर्ड) यांच्या माध्यमातून राष्ट्रध्वज तिरंगा उपलब्ध करुन देण्यात आले होते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मंडईमध्ये आणि विभाग कार्यालयांच्या परिसरात 'तिरंगा मेळा'चे आयोजन करुन त्यातील केंद्रांमध्ये देखील राष्ट्रध्वज तिरंगा उपलब्ध करण्यात आले होते.

महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला अत्यंत उत्तम प्रतिसाद देत मुंबईकर नागरिकांनी आपल्या घरी, चाळीत, वसाहतीत, सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये तसेच शैक्षणिक संस्था, कार्यालये आणि आस्थापना आदी ठिकाणी राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला. या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांचे आभार मानले आहेत.

'घरोघरी तिरंगा' अभियान आता संपन्न झाले आहे. सर्व मुंबईकरांनी घरोघरी लावलेले तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक काढून घ्यावे. संस्मरणीय आठवण म्हणून हे राष्ट्रध्वज आपल्याकडे सन्मानपूर्वक आणि सुयोग्य स्थितीत जपून ठेवावे, असे विनम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा