ताज्या बातम्या

Nagpur : भांडेवाडीच्या दाट वस्तीत बिबट्याचा शिरकाव; वनविभागाची बचावमोहीम सुरू

नागपूरच्या पारडी परिसरातील भांडेवाडी या दाट लोकवस्ती असलेल्या भागात आज सकाळी अचानक बिबट्या दिसल्याने मोठी खळबळ उडाली. सकाळी घराबाहेर खेळत असलेल्या एका लहान मुलाला इमारतीत बिबट्या दिसला आणि त्याने त्वरित घरच्यांना सांगितले.

Published by : Riddhi Vanne

नागपूरच्या पारडी परिसरातील भांडेवाडी या दाट लोकवस्ती असलेल्या भागात आज सकाळी अचानक बिबट्या दिसल्याने मोठी खळबळ उडाली. सकाळी घराबाहेर खेळत असलेल्या एका लहान मुलाला इमारतीत बिबट्या दिसला आणि त्याने त्वरित घरच्यांना सांगितले. मुलाच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांनीही बिबट्याची हालचाल पाहिली आणि पाहता पाहता परिसरात लोकांची एकच गर्दी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर घुसला होता. नागपूरसारख्या मोठ्या शहराच्या मध्यवर्ती रहिवासी भागात एवढ्या जवळून बिबट्या दिसणे ही अत्यंत धक्कादायक बाब असल्याचे स्थानिकांचे मत आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पारडी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर वनविभागालादेखील याची सूचना देण्यात आली.

वनविभागाचे पथक काही मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ट्रँक्विलायझर गनद्वारे (इंजेक्शन मारून) बिबट्याला शांत करून सुरक्षितरीत्या पकडण्याची मोहीम सुरू आहे. बिबट्या घराच्या आत घट्ट अडकल्याने आणि परिसरात लोकांची गर्दी वाढल्याने ही मोहीम अधिक गुंतागुंतीची झाली आहे. अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिक घाबरले असून, पोलिसांनी व वनविभागाने लोकांना घराबाहेर न येण्याचे आवाहन केले आहे. परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून, गर्दीतून कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी पोलीस व स्वयंसेवक प्रयत्न करत आहेत.

राज्यात अलीकडेच बिबट्याचे वाढते हल्ले व शहराजवळील भागात वावर हा गंभीर प्रश्न बनत असताना नागपूरच्या घनदाट वस्तीत अशा प्रकारे बिबट्या दिसणे ही चिंताजनक घटना मानली जात आहे. वनविभागाचा प्राथमिक अंदाज असा आहे की, अन्नाच्या शोधात अथवा जंगलाजवळील हालचाली वाढल्याने हा बिबट्या भांडेवाडीच्या वस्तीत आल्याची शक्यता आहे. दरम्यान, बचाव पथकाचे बिबट्याला सुरक्षित पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्या पकडल्यानंतर त्याला जंगलातील सुरक्षित ठिकाणी हलविण्याची शक्यता आहे. वनविभागाने नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आणि अधिकृत सूचना येईपर्यंत संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा