वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीच्या फेऱ्यांपासूनच बहुजन विकास आघाडीने (बविआ) ( Bahujan Vikas Aghadi )प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व मिळवत स्पष्ट आघाडी घेतली असून, तब्बल 115 पैकी 113 जागांवर आघाडी घेतल्याचे चित्र समोर आले आहे. या निकालांमुळे महायुतीला म्हणजेच भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे सकाळच्या प्रारंभिक कलांमध्ये महायुतीतील कोणत्याही पक्षाला खातेही उघडता आले नाही. भाजपचे तथाकथित ‘चाणक्य’ इथे सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र दिसत असून, निवडणूकपूर्व अंदाज पूर्णपणे फसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हितेंद्र ठाकूर यांचा करिष्मा अजूनही अबाधित
या निकालांचे श्रेय पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांच्याकडे जाते. यापूर्वी विधानसभा निवडणुकीत तीन आमदारांचा पराभव झाला असला, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर ठाकूर यांची पकड अजूनही मजबूत असल्याचे या निकालांवरून स्पष्ट होते. वसई-विरार परिसरात बविआचा प्रभाव आजही तसाच कायम आहे, हे मतदारांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
सर्व प्रभागांत बविआची मुसंडी
मतमोजणी सुरू होताच जवळपास सर्वच प्रभागांमध्ये बहुजन विकास आघाडी आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्यामुळे “वसई-विरारमध्ये पुन्हा एकदा शिट्टी वाजणार का?” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 2010 साली वसई-विरार महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून या महापालिकेवर बविआचे वर्चस्व आहे आणि यंदाही तोच इतिहास पुन्हा घडताना दिसत आहे.
भाजपच्या विजयी रथाला इथे ब्रेक
राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये भाजपने जोरदार कामगिरी करत मुसंडी मारलेली असताना, वसई-विरारमध्ये मात्र भाजपसह संपूर्ण महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळालेले नाही. मुंबईसह इतर ठिकाणी भाजप आघाडीवर असताना, वसई-विरारमध्ये मात्र त्यांचा विजयी रथ थांबल्याची चर्चा सुरू आहे.
मतमोजणी केंद्रांवर जल्लोषाची तयारी
दरम्यान, मतमोजणी केंद्रांवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून ढोल-ताशे, फटाके घेऊन समर्थक सज्ज झाले आहेत. पुढील काही फेऱ्यांमध्ये अंतिम चित्र अधिक स्पष्ट होणार असले तरी सध्याच्या कलांवरून बहुजन विकास आघाडी पुन्हा एकदा आपली सत्ता कायम ठेवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
आता सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की पुढील फेऱ्यांमध्ये महायुतीतील कोणत्यातरी पक्षाला खाते उघडता येते का, की वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा एकहाती झेंडा पुन्हा फडकणार?