New Twist in Disha Salian Case : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांचे नाव सतत चर्चेत येत होते. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी उच्च न्यायालयात केलेल्या खुलाशामुळे आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी आणि तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणतीही प्रकारच्या घातपाताची शक्यता नाही. तपासात मिळालेल्या माहितीप्रमाणे दिशा ही मृत्यूपूर्वी मद्यधुंद अवस्थेत होती आणि तिच्या मृत्यूमध्ये कोणताही गुन्हेगारी कट दिसून आलेला नाही. वैद्यकीय अहवालानुसार तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचेही निष्पन्न झालेले नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
दिशा सालियनच्या वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला होता. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान एसआयटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात दिशा सालियनच्या मृत्यूमध्ये कोणतीही संशयास्पद बाब नाही, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तपास अजून सुरू असून, या प्रकरणात सध्या तरी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणताही पुरावा आढळलेला नाही, असेही महायुती सरकारच्या एसआयटीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
दिशा सालियनचा 9 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील 12 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या मृत्यूला लेकरून विविध राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले होते. तिच्या वडिलांनी मुलीवर बलात्कार व हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. मुंबई पोलिसांनी मात्र दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणताही घातपात नसल्याचा निष्कर्ष काढला असून, याचिकेत कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत ती फेटाळण्याची विनंती हायकोर्टाकडे केली आहे.