बारामती शहरात रस्त्यावर स्टंट करताना पोलिसांनी अडवले म्हणून संतापलेल्या एका तरुणाने थेट पोलिसाच्या अंगावर कार घालण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बारामती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संतोष दत्तू कांबळे हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २९ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विद्या प्रतिष्ठान मार्गावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी एका कारचालक तरुणाने रस्त्यावर स्टंटबाजी सुरू केली होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिस हवालदार कांबळे यांनी त्याला अडवले. मात्र, अडवले गेले म्हणून या तरुणाने पोलिसांवरच आक्रमक होत अरेरावी करत शिवीगाळ केली. तसेच धमकी दिली की, "क्रेन बोलवाल तर गाडी खाली घेवून मारेल तुम्हाला". काही क्षणातच त्याने गाडी रिव्हर्स घेत थेट कांबळे यांच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव सुरू झाला.
जखमी कांबळे यांना तातडीने बारामतीतील भाग्यज्योत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या तरुणाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून कायद्याचे उल्लंघन केले. एवढेच नव्हेतर पोलिसांवर जीवघेणा हल्ला करत गुन्हेगारी वृत्तीचे दर्शन घडवले.
याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत काही तासांतच या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाकडून घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.