वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असताना पुण्यातील गुन्हेगारीचे सत्र काही थांबेना, अशाच एका धक्कादायक घटनेने शहर पुन्हा हादरले आहे. फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर करण्यात आला असून, त्याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (Atrocities Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणीचे 2020 पासून संबंधित आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी आरोपीने जातीय अडथळ्याचे कारण देत तिच्याशी विवाह करणे शक्य नसल्याचे सांगून संबंध तोडले. यातून मानसिक तणावात गेलेल्या तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवले.
हडपसर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आजही जातीच्या आधारावर नातेसंबंध तोडले जात असल्याचे हे उदाहरण समाजासमोर आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे सामाजिक पातळीवर चर्चेला आणि चिंता व्यक्त करण्यात येत असून, युवक-युवतींमध्ये मानसिक आरोग्य व जबाबदार संबंध याबाबत जागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.