महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये ७ फेब्रुवारी २०२६ रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबत GR (Government Resolution) जारी केला असून, हे निर्णय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी झाले आहेत. शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि मतदारांना आपला मतदानाचा हक्का बजावता यावा यासाठी ही सुट्टी लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. सुरुवातीला ही निवडणूक ५ फेब्रुवारीला पार पडणार होती, परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आणि त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता मतदान ७ फेब्रुवारी रोजी आणि मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे.
सुट्टी फक्त सरकारी कार्यालयांपुरती मर्यादित नाही; खासगी कंपन्या, आयटी (IT) पार्क्स, कॉर्पोरेट ऑफिस, उद्योग, व्यापारी क्षेत्र, दुकाने, शॉपिंग मॉल्स, रिटेलर्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खाद्यगृहे आणि नाट्यगृहे यांनाही लागू केली जाईल. यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने तातडीचे परिपत्रक जारी केले आहे. विशेष बाब म्हणजे, जे कामगार मतदान क्षेत्राबाहेर असले तरीही त्या मतदारांना ही भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक राहणार आहे. ज्या आस्थापनांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही किंवा जिथे काम थांबवल्यास मोठे नुकसान होईल (उदा. अत्यावश्यक सेवा), अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान २ ते ३ तासांची सवलत देणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, मतदानासाठी सुट्टी न देणाऱ्या किंवा कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करणाऱ्या संस्थांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार ही कारवाई अनिवार्य असेल. त्यामुळे सर्व कंपन्या, उद्योग आणि व्यापारी प्रतिष्ठानांना या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. या निर्णयामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, तसेच नागरिकांना मतदानाचा अधिकार सहज आणि सुरक्षित मार्गाने वापरण्याची संधी मिळेल. प्रशासनानेही सर्व निवडणूक क्षेत्रांमध्ये सुरक्षा व नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती तयारी सुरू केली आहे.
राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये ही भरपगारी सुट्टी लागू होणार आहे.
कोकण विभाग: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर
या जिल्ह्यांमध्ये सर्व सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचारी मतदानासाठी सुट्टीचा लाभ घेऊ शकतील. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी सुरक्षा, रस्ते, वाहतूक व मदत केंद्रे तयार ठेवली आहेत.