दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात आज सकाळी मोठी घटना घडली. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये सुरु असलेल्या जनसुनावणी दरम्यान एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने सुरुवातीला मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदन दिले, मात्र अचानक तो रागाला गेला.
त्याने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना शिव्या देत त्यांच्या कानाखाली कानशिलात लगावली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर वारंवार कानाखाली मारून त्यांच्या केसांना धरूनही मारू लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. त्वरित पोलिसांनी हस्तक्षेप करत हल्लेखोराला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हल्लेखोराचे वय अंदाजे 35 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक तपासात तो न्यायालयीन खटल्याचा संदर्भ देत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी सुरू केली असून त्याची राजकीय ओळख असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले असून त्यांच्या जखमांची तपशीलवार माहिती तपासानंतर मिळेल.
दरम्यान, भाजपने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी संबंधित व्यक्ती नैराश्यात गेलेल्या एका राजकीय पक्षाशी संबंधित असू शकतो, असे सूचक वक्तव्य केले. तर भाजप नेते रमेश बिधुरी यांनी हा हल्ला जनसुनावणीला अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला असून पोलिस तपासानंतर नेमके कारण समोर येईल.