ताज्या बातम्या

Kidney Scam : किडनी विक्रीच्या बहाण्याने सायबर फसवणूक; आर्थिक अडचणीत असलेल्या व्यक्तीची 3 लाखांची फसवणूक

आर्थिक संकटात अडकलेल्या एका व्यक्तीला किडनी विक्रीच्या आमिषाने तब्बल 2.95 लाखांचा गंडा घालण्यात आला.

Published by : Team Lokshahi

तंत्रज्ञानाने जग जवळ आले असले, तरी त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीचं जाळंही अधिक घट्ट होत चाललं आहे. विशेषतः गरिबी व अडचणीत सापडलेली मंडळी या जाळ्यात अडकण्याची शक्यता जास्त असते. असाच एक धक्कादायक प्रकार दहिसरमध्ये समोर आला आहे, जिथे आर्थिक संकटात अडकलेल्या एका व्यक्तीला किडनी विक्रीच्या आमिषाने तब्बल 2.95 लाखांचा गंडा घालण्यात आला.

दहिसरमधील झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीत राहणारे 45 वर्षीय प्रशांत नागवेकर हे आपल्या कुटुंबासोबत एका लहानशा फ्लॅटमध्ये राहतात. पत्नी, मुलगा, आई आणि भाऊ अशा पाच जणांचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रशांत अंधेरी येथील एका खासगी कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतात. त्यांचा मासिक पगार केवळ 15 हजार रुपये असून त्यातील बहुतांश रक्कम घरभाडे व खर्चांमध्ये संपतो.

गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणींना वैतागलेल्या प्रशांत यांना आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि स्वतःच्या घरासाठी काहीतरी मोठं करावं लागेल, असं वाटत होतं. कर्ज घेण्याऐवजी त्यांनी किडनी विकण्याचा विचार केला आणि इंटरनेटवर याबाबत माहिती शोधण्यास सुरुवात केली.

दरम्यान, डार्क वेबवर त्यांनी एका जाहिरातीत दिल्लीतील एका रुग्णालयाच्या नावाने दिलेला मोबाईल नंबर पाहिला आणि त्यावर संपर्क केला. सुरुवातीला विश्वासात घेऊन त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करण्यात आली. काही दिवसांतच व्हॉट्सअॅप कॉलवर त्यांच्याशी पुन्हा संपर्क केला गेला. कॉल करणाऱ्याने त्यांना किडनीच्या बदल्यात 1 कोटी रुपये देण्याचं आमिष दाखवलं, मात्र शस्त्रक्रियेसाठी पूर्वचाचण्यांसाठी 2.95 लाख रुपये भरण्याची अट घातली.

प्रशांत यांच्याकडे एवढी रक्कम नसल्याने त्यांनी डिजिटल कर्ज अ‍ॅप्सद्वारे कर्ज घेऊन ही रक्कम तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा केली. मात्र पैसे जमा केल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी आणखी 1.30 लाखांची मागणी केली. तेव्हा प्रशांत यांना संशय आला आणि त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. पुढे संपर्क करायचा प्रयत्न केला असता, संबंधित नंबर बंद आले.

अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशांत यांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

ही घटना गरिबी व मानसिक विवंचनेत सापडलेल्या व्यक्ती कशा सहज सायबर ठगांच्या जाळ्यात अडकतात, याचं गंभीर उदाहरण आहे. नागरिकांनी अशा प्रलोभनांना बळी न पडता अधिकृत मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latur : लातूरमधील पत्रकार परिषदेत गोंधळ; छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

Pune Crime : भोंदू ज्योतिषानं महिलेला एकांतात बोलावलं, अन् पुढे...; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड

Indonesian Passenger Ferry : इंडोनेशियात समुद्रात मोठी दुर्घटना; प्रवासी जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update live : लातूरमधील सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ