रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ रविवारी पहाटे मुंबईवरून मालवणकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागली. प्रवाशी झोपेत असतानाच बसच्या टायरमधून ठिणगी उठल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुदैवाने बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे 40 पेक्षा अधिक प्रवासी सुखरूप बचावले.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईतील अनेक कोकणवासीय कोकणात गावी जात आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. अशाच एका प्रवासादरम्यान पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटातील बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली.
बसचा टायर गरम झाल्याने पेट घेतला आणि काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. चालकाने तातडीने बस थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रवाशांचे बरेचसे सामान डिकीत असल्याने पूर्णपणे जळून खाक झाले.
घटनास्थळी खेड आणि महाड अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले व आग नियंत्रणात आणली. दरम्यान, प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये झालेली ही दुर्घटना मोठ्या थरारक ठरली असली तरी सर्वजण सुखरूप असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.