छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भालगाव फाटा येथील एका खासगी शाळेने कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद केल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या अचानक घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून पालकांनी आपल्या मुलांना गणवेश घालून, दप्तर घेऊन थेट जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आणले आणि सीईओंच्या कार्यालयासमोरच ‘शाळा’ भरवली.
भालगाव फाटा परिसरातील ही खासगी शाळा अनेक वर्षांपासून सुरू होती. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षात कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सर्वच गोंधळात सापडले आहेत. शाळा प्रशासनाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
या प्रकाराविरोधात निषेध व्यक्त करताना पालकांनी अनोखी आणि ठोस कृती केली. त्यांनी विद्यार्थ्यांना युनिफॉर्म घालून, दप्तर घेऊन जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या कार्यालयासमोर आणले. तेथेच शिक्षण घेण्यास सुरुवात केली. यावेळी काही शिक्षकही उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वर्गासारख्या रांगा करून बसत पुस्तक वाचणे सुरू केले. हे दृश्य पाहून परिसरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली.
यावेळी पालकांनी संतप्त भावना व्यक्त करत म्हटले की, "आम्ही फी वेळेवर भरली, आमची मुलं नियमित शाळेत जात होती. मग शाळा अचानक बंद करण्यामागचं कारण काय?, आम्ही गरजू आहोत, पण आमच्या मुलांच्या भविष्याशी कोणी खेळू नये."
तसेच एका पालकाने सांगितले की, "शाळा बंद असेल तर जिल्हा परिषद तरी दुसरा पर्याय देईल का?, की आमची मुलं घरातच बसून राहतील?, शिक्षणाचा हक्क हिरावून घेणं हे आम्हाला मान्य नाही."
शाळेच्या या अचानक बंदप्रकरणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात सीईओंनी त्वरित चौकशी करून विद्यार्थ्यांना पर्यायी शाळेत प्रवेश देण्याचे आदेश द्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शाळा बंद करणे हे शिक्षण हक्क अधिनियमाच्या विरोधात असून, संबंधित शाळा प्रशासनावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा घटनांमुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
"आमच्या शाळेत कुठलाही नियम पाळला जात नाही. शिक्षक म्हणाल तर फक्त चारच शिक्षक येतात. पहिली ते पाचवीचे सर्व विद्यार्थी एकाच वर्गात बसवले जातात, तसेच पाचवी ते दहावीचे सुद्धा. म्हणजे एकाच वर्गात पहिलीपासून दहावीपर्यंतचे सगळे बसतात. शाळेत कोणी खेळत असेल तर त्याला कोणी अडवत नाही, कोणी धिंगाणा घालत असेल तरीही काही नियम नाहीत. शिक्षक काही सूचना देत नाहीत. सकाळी आम्ही शाळेत आलो तर दरवाजाला कुलूप लावलेलं होतं. तेव्हा समजलं की शाळा बंद पडली आहे. मग आम्ही आमच्या पालकांना घेऊन आलो आणि कार्यालयासमोरच शाळा भरवली", अशी प्रतिक्रिया येथील मुलांनी दिली.
हेही वाचा